नंदुरबार : जिल्ह्यात काल(रविवार) प्राप्त अहवालात सहाजण कोरोना पाझिटिव्ह आढळले, तर दहाजण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यामुळे चिंता वाढविणार्या बातमी सोबतच दिलासा देणारी वार्ताही आली. यामुळे, जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 163 वर पोहोचला आहे. बाधितांचे अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने बाधितांच्या वास्तव्य परिसरात जाऊन भेट दिली. तर, आरोग्य विभागाने लागलीच सर्वेक्षण मोहीम हाती घेतली.
जिल्ह्यात 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी, या संसर्गावर मात करणार्यांची संख्यादेखील तेवढीच दिलासादायक आहे. गेल्या 20 दिवसांपासून नंदुरबार जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. दिवसेंदिवस येणार्या अहवालात पॉझिटिव्ह रुग्णांची भर आढळून येत असल्याने तीन आठवड्यात जिल्ह्याने शंभरी पार करत बाधितांचा आकडा 163 वर पोहोचला आहे. कोरोना संदर्भातील अहवालामध्ये सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या पॉझिटिव्ह आलेल्या सहा बाधितांमुळे नंदुरबारकरांसाठी चिंतादायक बातमी होती. परंतु त्याच अहवालात दहाजण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला.
प्राप्त झालेल्या अहवालात नंदुरबार येथील कोकणीहील भागातील 27 वर्षीय महिला, सिध्दीविनायक चौकातील 28 वर्षीय महिला, वृंदावन कॉलनीतील 50 वर्षीय महिला, नंदुरबार तालुक्यातील धुळवद येथील 47 वर्षीय पुरुष, तळोद्यातील खान्देश गल्लीतील 53 वर्षीय पुरुष तर शहाद्यातील गणेश नगरातील 42 वर्षीय पुरुष असे सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील धुळवद गावात कोरोनाने शिरकाव केला आहे. बाधितांचे अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने बाधितांच्या वास्तव्याच्या परिसराला भेट देऊन कंटेन्मेंट झोन केले आहे. पालिका व ग्रामपंचायतीने सदर भागात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तर आरोग्य विभाग बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेऊन सर्वेक्षण करत आहे.
हेही वाचा -नंदूरबार जिल्ह्यात 8 दिवसांचा जनता कर्फ्यू लावावा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
काल नवीन सहा रुग्ण आढळल्याने जिल्ह्याचा आकडा 163 वर पोहोचला आहे. तर, दहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात नंदुरबार येथील मनियार मोहल्ला भागातील एकजण, तळोदा येथील काकाशेठ गल्लीतील एक व तळोदा येथील मोठा माळी वाड्यातील चारजण, शिवराम नगरातील एकजण, अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी, शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील एकजण अशा दहा जणांनी कोरोनावर मात केली आहे.