नंदुरबार -शहरासह जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी शंभरीनजीक पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 89 वर आहे. तर, दुसरीकडे आणखी 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. असे असले तरी नंदुरबार शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शहरवासियांची चिंता आणखीन वाढली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी आणखी सहा कोरोनाबाधितांची भर नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व बाधित रुग्ण संसर्गमुक्त होत असल्याचा प्रकार सुरू आहे. सोमवारी असाच प्रकार झाल्याने सकाळी दिलासा व सायंकाळी पुन्हा चिंतेची वेळ जिल्हावासियांवर येऊन ठेपली. तर, मंगळवारी पुन्हा सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि पाचजण कोरोनामुक्त झाल्याचा अहवाल एकाचवेळी प्राप्त झाला. यात सहाजण पॉझिटिव्ह आढळल्याने एका तासांपूर्वी जिल्हावासियांची धकधक वाढली असताना काही मिनिटांनी पाचजण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक बातमीही मिळाली.
सायंकाळी सुरुवातीला आलेल्या अहवालात सहाजण कोरोनाबाधित आढळले. त्यात नंदुरबार शहरातील मंगळबाजार सिद्धीविनायक चौक परिसरात 77 वर्षीय महिला, धर्मशांती नगरात 36 वर्षीय व 34 वर्षीय पुरुष आणि 9 वर्षीय मुलाला, तर गिरीविहार परिसरात 56 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नंदुरबार शहरात एकाच दिवशी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरवासियांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील 27 वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यावेळी प्रशासनाने लागलीच दखल घेत ते राहत असलेल्या नंदुरबार शहरातील सिद्धीविनायक चौक, धर्मशांती नगर, गिरीविहीर या भागातील परिसर बॅरिकेटींग करून कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड, शहर पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जेआर तडवी यांनी बाधितांच्या वास्तव्य भागात भेट देवून पाहणी केली. तसेच आरोग्य विभागाकडून बाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांची माहिती काढण्यात येत असून सर्वेक्षण केले जात आहे.
हेही वाचा -नंदुरबारमध्ये रक्ताने भरलेल्या टेस्टट्युबसह सिरींजसाठा आढळला उघड्यावर; आरोग्य विभागाने साठा घेतला ताब्यात
शहरातील धर्मशांती नगरात आढळून आलेले कोरोनाचे तीन रुग्ण हे सिंधी कॉलनीतील बाधित रुग्णांच्या संपर्कातील आहे. त्यामुळे या तिघांसह कुटुंबियांना यापूर्वीच क्वारंटाइन करण्यात आले होते. तर, सिद्धीविनायक चौकातील बाधिताच्या संपर्कात आलेल्या 13 जणांना व गिरीविहार येथील बाधिताच्या संपर्कातील 8 व्यक्तींना आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा सध्या 89 वर पोहोचला असून त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 52 जण कोरोनामुक्त झाले असून 30 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.