नंदुरबार Show Cause Notice To Teachers :राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा याकरता आदिवासी विकास विभागाच्या वतीने दर तीन महिन्याला विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. या क्षमता चाचणीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांची देखील क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. शिक्षकांच्या पहिल्या क्षमता चाचणीत 13000 पैकी फक्त 511 शिक्षकांनी क्षमता चाचणी दिली आहे. यामुळे आता आदिवासी विकास विभाग 'ॲक्शन मोड'मध्ये आल्याचं दिसून येत आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गैरहजर शिक्षकांना 'कारणे दाखवा' नोटीस बजाविण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे. तर काही शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
परीक्षेची पुन्हा संधी मिळणार :क्षमता चाचणीस अनुउपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावून पुन्हा परीक्षेची संधी देणार असं मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी म्हटलं आहे. राज्यात आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये जवळपास 13 हजार शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. या शिक्षकांची क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय राज्याच्या आदिवासी विकास विभागाने घेतला होता. आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या क्षमता चाचणीला 13000 पैकी फक्त 511 शिक्षक उपस्थित होते. विविध शिक्षक संघटनांनी या क्षमता चाचणीला विरोध दर्शवला होता. या चाचणीला अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना 'कारणे दाखवा' नोटीस बजविण्यात येणार आहे. नोटीसीनंतर शिक्षकांना परीक्षेची एक संधी देण्यात येणार आहे. मात्र, दुसऱ्या वेळेस ही परीक्षा न देणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला आहे.