नंदुरबार - आगामी जिल्हा परिषद निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढवण्याची तयारी दर्शवली आहे. शहरातील संजय टाऊन हॉलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, आमश्या पाडवी यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीदेखील घेतल्या.
यावेळी, "स्वबळावर लढण्याची वल्गना करणार्यांनी शिवसेनेला कमी समजु नये. सत्ता स्थापनेवेळी दगा देणार्या भाजपला जागा दाखवण्यासाठी शिवसैनिकांनी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागावे" असे आवाहन चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्यात येतील, असेही रघुवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सत्तेवर येणे महत्वाचे आहे. त्यामुळे पक्षाचे तिकीट न मिळाल्यास नाराजी न बाळगता शिवसैनिकांनी कामाला लागावे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.