नंदूरबार - जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. नंदुरबार, शहादा, नवापूर, अक्कलकुवा याठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बैलगाडी आंदोलन करण्यात आले. तर शहादा येथे शिवसैनिकांनी सायकल रॅली काढत आंदोलन केले.
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हाभर आंदोलन - भाजप सरकारचा निषेध
नंदुरबार, शहादा, नवापूर, अक्कलकुवा याठिकाणी शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने बैलगाडी आंदोलन करण्यात आले. तर शहादा येथे शिवसैनिकांनी सायकल रॅली काढत आंदोलन केले.
गुजरात व महाराष्ट्रात दहा रुपयांचा फरक
नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलचे दर 94.01 डिझेल 83.39 रुपये एवढे झाले आहे. तर शेजारील गुजरातमध्ये पेट्रोलचे दर महाराष्ट्रापेक्षा दहा रुपयांनी कमी असल्याने केंद्र सरकार राज्यांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप शिवसेनेने या आंदोलनात केला.
दुचाकीची बैलगाडीतून मिरवणूक
आंदोलकांनी यावेळी खांद्यावर सिलिंडर घेत तसेच दुचाकीची बैलगाडीतून मिरवणूक काढत केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकार एकीकडे मोठमोठ्या घोषणा करीत आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांचे हाल करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. केंद्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.
शहाद्यात सायकल रॅली
शहाद्यात शिवसेनेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकापासून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी तहसील कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढली. तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देत आंदोलकांनी इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी यावेळी केली.
अक्कलकुवा आणि नवापुरात आंदोलन
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि नवापूरमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. नवापूर येथे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले तर अक्कलकुवा येथेही तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.