नंदुरबार -सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या, मात्र विद्यार्थी आणि पालकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली. अत्यंत कमी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये शाळा सुरू झाल्या. शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी सोमवारी अनेक शाळेंना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाकडून खबरदारी
सरकारने शाळा सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर शाळेच्या सर्व खोल्यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच शाळेत विद्यार्थांना मास्क घालने सक्तीचे करण्यात आले आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना मास्कशिवाय शाळेत प्रवेश देण्यात येत नाही. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग देखील करण्यात येत आहे. थर्मल स्कॅनिंगसाठी गेटवर कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.