नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासापासून पावसाची संततधार सुरू असून पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तसेच दमदार अशा पावसाने जिल्ह्यातील सर्वच लहान मोठ्या नदी-नाले प्रवाहित झाल्याने लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
जिल्ह्यातून वाहणारी सर्वात मोठी नदी 'तापी'च्या पात्रात जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे पाणी सोडल्याने नदीला महापूर आला आहे. तसेच या नदीवर सारंखेडा आणि प्रकाशा येथे उभारण्यात आलेल्या बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासन तापी नदीतील पूर स्थितीवर लक्ष ठेवून आहे.