नंदुरबार - दत्तजयंतीपासून सुरू झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात आतापर्यंत २ हजार ५०० घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यापैकी २०० घोड्यांची विक्रीदेखील झाली आहे. घोडे बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत असून यंदा उलाढालीचे सर्व विक्रम मोडीत निघतील, असा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे.
अवघ्या दोन दिवसात सारंगखेडा घोडे बाजारात ७५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. जातीवंत आणि उमद्या घोड्यासाठी सारंगखेडा येथील घोडेबाजार ओळखला जातो. अश्व पंढरीत संबोधल्या जाणाऱ्या या बाजारात देशभरातील अश्वांची आवड असणारे खरेदीसाठी येतात. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने बाजारात मंदी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, बाजाराला मिळणारा प्रतिसाद पाहता हा अंदाज फोल ठरला आहे.