नंदुरबार -जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील ज्या भागात हे कर्मचारी राहत होते तो भाग प्रशासनाच्यावतीने सील करण्यात आला आहे. या भागात बाहेरील नागरिकांना जाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे. पालिकेच्यावतीने याभागात निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत.
जिल्हा रुग्णालयातील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त होताच सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. तडवी यांनी बाधित कर्मचार्यांच्या परिसराला भेट दिली. या भागात तत्काळ बॅरिकेटींग करुन सर्व बंद करण्यात आले. बाधित कर्मचार्यांच्या कुटुंबीयांसह त्याच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. प्रशासनाने भोई गल्लीसह परिसरातील वसाहतींमध्ये फवारणी करुन ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.