महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणलोट विकास कार्यक्रमासाठी आसाणे गावात श्रमदान; मिळणार दीड कोटींचे अर्थसहाय्य

नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावात विविध विकासकामे सुरू आहेत. या विकास कामांसाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन श्रमदान केले आहे. नाबार्डच्यावतीने या गावाला दीड कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

By

Published : Dec 4, 2020, 3:42 PM IST

Updated : Dec 4, 2020, 4:23 PM IST

work
श्रमदान

नंदुरबार - तालुक्यातील आसाणे गावची डी.एस.सी.संस्थेकडून नाबार्ड अर्थसहाय्यीत पाणलोट विकास कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी दीड कोटी रुपये मिळणार आहेत. हे काम पूर्ण व्हावे यासाठी गावकरी दहा टक्के श्रमदान करत आहेत. त्याची सुरुवात झाली असून श्रमदानासाठी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

पाणलोट विकास कार्यक्रमासाठी आसाणे गावात नागरिकांनी श्रमदान केले

गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत विकास कामे -
आसाणे येथे गेल्या दोन वर्षापासून डी.एस.सी संस्था, पाणी फाउंडेशन व ग्रामपंचायत यांच्यावतीने संयुक्तपणे गावाच्या विकासासाठी कामे सुरू आहेत. गेल्या दोन वर्षापासून गावातील शेतकर्‍यांना शाश्वत शेती व त्याबरोबर शेती जोड व्यवसाय कसा करता येईल याचे प्रशिक्षण मिळाले आहे. डी.एस.सी. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही राबवले गेले आहेत.

नाबार्डच्या अटीला गावकऱ्यांचा प्रतिसाद -
पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत गावकर्‍यांनी श्रमदानातून कामे केलेली आहेत. त्याचे समाधानकारक परिणामही गावकऱ्यांना मिळाला आहे.परंतु, आणखी मोठ्या प्रमाणावर पाणलोट क्षेत्रात कामे बाकी आहेत. या कामांना जलद गतीने मंजुरी आणि दीड कोटी रुपये मिळतील मात्र, त्यासाठी गावकर्‍यांनी दहा टक्के श्रमदान केले पाहिजे, अशी अट नाबार्डने घातली. त्याला गावकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

श्रमदानातून धरणातील गाळ काढला -
ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानादरम्यान गावाजवळ असलेल्या धरणातील गाळ काढण्यात आला. आसाणे गावातील वन जमीन, कृषी जमीन, गावठाण गायरान असे एकूण १००० हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. याचा भविष्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

अधिकाऱ्यांचेही सहकार्य -
गावकऱ्यांच्या श्रमदानासाठी नाबार्डचे प्रमोद पाटील, डीएससी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थपक जितेंद्र सोनवणे, चंद्रकांत देवरे, श्यामकांत पाटील, प्रविण अहिरे, निखिल पवार, संदिप कोळी, पाणी फौंडेशनचे जिल्हा समन्वयक सुखदेव भोसले, रविंद्र पाटील, सागर पाटील, सुनील पाटील व सर्व महिला, शेतकरी श्रमदानासाठी हजर होते.

Last Updated : Dec 4, 2020, 4:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details