नंदुरबार - जोपर्यंत मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणावरील स्थगिती उठवण्यात येत नाही, तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल माराठा समाजाच्यावतीने करण्यात आली होती. ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी रास्तारोको आणि आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे नंदुरबारमध्ये मराठा समाज्याच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा समाजबांधवांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत जल्लोष साजरा केला.
'एमपीएससी' परीक्षा पुढे ढकलल्याने मराठा समाजाकडून जल्लोष - एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली
जोपर्यंत मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणावरील स्थगिती उठवण्यात येत नाही, तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल माराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने नंदुरबारमध्ये जल्लोष करण्यात आला.
आरक्षणावरील स्थगिती उठविण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलाव्यात व मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, अशा विविध मागण्या मराठा समाजाच्यावतीने करण्यात आल्या होत्या. त्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र आता परीक्षा पुढे ढकलल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन फटाके फोडण्यात आले. तसेच पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टाकडून आलेली स्थगिती उठून मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.