नंदुरबार- जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट काहीअंशी टळले आहे.
नंदुरबार मधील पिकांना पावसाचा दिलासा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाचा मोठा खंड पडत गेला आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यात अजूनही 30 टक्के पेरण्या बाकी आहेत. पेरणी केलेल्या पिकांची कमी पर्जन्यामुळे कमी वाढ झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, मका, तूर, भात, ज्वारी या पारंपारिक पिकांची पेरणी केली आहे. मात्र, कमी पावसामुळे या पिकांची वाढ पाहिजे तशी झालेली नाही. रविवारी झालेल्या या पावसाने पिकांना आधार मिळाला असला तरी यापुढे कधी पाऊस येईल आणि पिकांची वाढ कशी होईल आणि उत्पन्न कसे निघेल याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
यावर्षीच्या हंगामात पहिल्यांदा विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटासह झालेल्या पावसाची प्रथमच अतिवृष्टीत नोंद झाली आहे. गेल्या 48 तासात जिल्ह्यात २५३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी नवापूर तालुक्यात ७० नंदुरबार ६१ शहादा २८ तळोदा ३९ अक्कलकुवा ४७ तर धडगाव ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.