नंदुरबार - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्याचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. यावेळी नंदुरबार तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले.
नंदुरबारमध्ये आमदार पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आमदार पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, याबाबत तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर 'शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना' अशा शब्दात टीका केली होती. या टिकेनंतर आमदार पडळकर यांच्याविरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आमदार पडळकर यांच्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आमदार पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी याबाबत तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. एकूणच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून पडळकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात केली आहे.