नंदुरबार- जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी. त्याचबरोबर, शासनाने पंचनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सुरू केलेली फसवणूक थांबवावी, अशा मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
प्रहार संघटनेच्यावतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना ४ नोव्हेंबरला निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनात संघटनेच्यावतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, पंचनाम्याचा खेळ न करता सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मदत देणे, विद्युत पंपासाठी रात्री दिला जाणारा विद्युत पुरवठा दिवसा देणे, गेल्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे त्वरित मिळणे, यासह विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.