नंदुरबार -चिकन व अंडी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अद्याप 'बर्ड फ्लू'चा शिरकाव झालेला नाही. परंतु अफवांमुळे चिकन व अंड्यांच्या मागणीत घट झाली आहे. व्यापारी कमी दराने चिकन आणि अंडी खरेदी करत असल्यामुळे कुक्कुटपालन करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
पोल्ट्री व्यवसायिकांकडून विशेष काळजी
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय असल्याने, बर्ड फ्ल्यू बाबत विशेष काळजी घेतली जात आहे. जेणेकरून बर्ड फ्ल्यू सारख्या आजाराचा तालुक्यात शिरकाव होऊ नये, व व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ नसे म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.
बर्ड फ्लूच्या अफवेमुळे व्यवसायावर मोठा परिणाम
जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूची लक्षणे नसली तरी बर्ड फ्लूच्या अफवांमुळे चिकन व अंडी विक्रीवर मोठा परिणाम जाणवत आहे. बर्ड फ्लूपूर्वी किरकोळ बाजारात चिकनचा दर 200 रुपये किलो होता. मात्र आता दरामध्ये घट झाली असून, चिकनचा दर 150 रुपयांपर्यंत खाली आला आहे. अंड्यांच्या किंमतीमध्ये देखील मोठी घट झाली आहे.
2006 ची पुनरावृत्ती नको
सन 2006 मध्ये नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याने संपूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला होता. साधारण 35 कोटींचे नुकसान झाले होते. त्यामुळे 2006 ची पुनरावृत्ती नको म्हणून व्यवसायिकांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
बर्ड फ्लूच्या अफवांमुळे कुक्कुट व्यवसाय अडचणीत जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाचे मोठे जाळे
सद्यस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात 19 मोठे पोल्ट्री व्यवयायिक आहेत. तर 70 पेक्षा अधिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी आहेत. बर्ड फ्लूच्या अफवांमुळे चिकन व अंड्यांच्या दरामध्ये घसरण झाल्याने हे व्यवसायिक अडचणीत आले आहेत. त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी अशी अपेक्षा कुक्कुटपालन करणारे शेतकरी करत आहेत.
जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव नाही
महाराष्ट्र गुजरातच्या सिमावर्ती भागातील उच्छल परिसरामध्ये बर्ड फ्लूमुळे 2000 पेक्षा अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने, शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूने शिरकाव केला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.