नंदुरबार - कारमधून अवैधरित्या वाहतूक केला जाणारा मद्यसाठा जप्त केल्याची कारवाई नंदुरबारच्या एलसीबी पथकाने केली. या कारवाईत दारुसह 3 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाविरुध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदूरबारमध्ये कारमधून दारुची अवैध वाहतूक; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त - police seized illegal Liquor
नंदूरबारमध्ये पोलिसांनी तीन लाखांची अवैध दारू जप्त केली आहे. कारच्या बोनटमध्ये लपवून दारूची वाहतूक केली जात होती.
पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई-
नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्याने एका वाहनातून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना मिळाली. यावेळी त्यांच्या पथकाने तळोदा रस्त्यावरील नळवा गावाकडे जाणार्या रस्त्यावर सापळा रचला. दुपारी 1 वाजेदरम्यान भरधाव वेगात येणार्या कारवर संशय आल्याने पथकाने सदर गाडी थांबवून विचारपूस केली. यावेळी चालकाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये अवैधरित्या दारूची तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाले.
कारच्या बोनटमध्ये लपवली होती दारू -
कारची तपासणी केली असता कारमध्ये दारू आढळून न आल्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी कारच्या बोनेटमध्ये दरवाज्याची तपासणी केली. कारच्या कव्हरमधून विदेशी दारुच्या 190 बाटल्या आढळल्या. यावेळी पथकाने अवैध दारूसह 3 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घनश्यामभाई खमजीभाई खेनी (रा. सुरत) याच्याविरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबी पथकाची कारवाई -
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, हेड कॉन्स्टेबल मुकेश तावडे, पोलीस नाईक मनोज नाईक, जितेंद्र ठाकूर यांच्या पथकाने केली.
हेही वाचा -'टॉप्स सिक्युरीटी'च्या रमेश अय्यरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल