नंदुरबार - त्रिपुरा घटनेच्या(Tripura Violence) पार्श्वभूमीवर राज्यात नांदेड, अमरावती आणि मालेगाव याठिकाणी झालेल्या घटनांच्या निषेधार्थ आज भाजपने आंदोलन(Nandurbar BJP Protest) पुकारले होते. भाजप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर(Nandurbar Collector Office) आंदोलन करणार होते. मात्र, सकाळी सर्व कार्यकर्ते भाजप कार्यालयात गोळा झाल्यानंतर ते कार्यालयाच्या बाहेर पडताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
भाजप जिल्हाध्यक्षांना कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन न करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, तरीही पोलीस नोटिसीला न जुमानता ते आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
विजय चौधरी - भाजप, जिल्हाध्यक्ष - आंदोलनासाठी जाणाऱया भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले -
राज्यात अनेक ठिकाणी दंगलीसारख्या घटना घडल्या होत्या. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नंदुरबार येथे भाजपतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भाजपच्या 'विजय पर्व' या जिल्हा कार्यालयावर सकाळपासूनच पोलिसांनी गराडा घातला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांना आंदोलन न करण्याची सूचना केली. पोलिसांच्या सूचना झुगारून शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आंदोलनासाठी सरसावले असता, त्यांना पोलिसांनी मध्येच रोखले. यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व आमदार राजेश पाडवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत काही कालावधीनंतर सुटका केली.
- उच्चस्तरीय चौकशी करण्याची भाजपची मागणी -
रजा अकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रप्रेमी तसेच निरपराध नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने खोटे गुन्हे दाखल करून राष्ट्रप्रेमी नागरिकांवर अन्याय, अत्याचार केला आहे. हे गुन्हे मागे घ्यावेत व राज्यात दंगली घडवणाऱ्या रजा अकॅडमीची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे.