नंदुरबार : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला नंदुरबार येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली. मुखमंत्र्यांच्या या दौऱ्यात शेवटच्या क्षणी सुधारणा करण्यात आली आणि मुख्यमंत्री नंदुरबार जिल्ह्या दौऱ्याची ( CM Eknath Shinde in nandurbar ) सुरूवात पालकमंत्री डाॅ विजयकुमार गावीत (Guardian Minister Vijayakumar gavit ) यांच्या निवासस्थानापासून सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजप काय भुमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता मुख्यमंत्री स्वतः आधी डाॅ गावीताकडे आले असल्याने तर्कवितर्काना पूर्णविराम मिळाला आहे. सुरूवातीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेचे आगमन झाल्यानंतर ते थेट नगरपरिषद नुतन इमारतीच्या लोकार्पणाला सोहळ्यात उपस्थित होते.
पालकमंत्री डाॅ विजयकुमार गावीत यांच्या निवास्थानी भेट - या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी दहा मिनिट डाॅ गावीतांकडे भेट दिली आहे. नंदुरबार तालुक्यात शिंदे सेना विरुद्ध भाजपा असा राजकीय संघर्ष असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर प्रशासन सज्ज नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असून सकाळी 11 वाजता नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला आहे. तब्बल 22 कोटी रुपये खर्च करून नंदुरबार नगर परिषदेची भव्य इमारत तयार करण्यात आली आहे. नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील जवळपास सात मंत्री व 14 आजी माजी खासदार आमदार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. नंदुरबार शहर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठी सजावट करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची जाहीर सभा - छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे सत्कार समारंभ पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी दीड वाजता नंदुरबार शहरातील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची जाहीर सभा होणार आहे. या सभेला जवळपास 20 हजार नागरिक उपस्थित राहण्याची सोय करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासन सज्ज - मुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील विविध खात्यांचे मंत्री नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले असल्याने यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे बंदोबस्त करण्यात आला आहे. या दौऱ्यानिमित्त नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री व पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक 1, अप्पर पोलीस अधीक्षक 1, डी वाय एस पी 7, पोलीस निरीक्षक 16, पीएसआय 46 आणि कर्मचारी 654 असा मोठा फौज फाटा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी तैनात करण्यात आला आहे.