नंदुरबार- जिल्ह्यात संचारबंदी काळात नागरिकांनी घराबाहेर निघू नये, असे वारंवार पोलीस प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. तरी देखील नागरिक संचार बंदीचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे, आता मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे किंवा २०० रुपये दंड वसूल करणे, असा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नवापूर शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला आहे.
नवापूर शहरातील रंगेश्वर पार्कमध्ये व्यायामाच्या बहाण्याने सकाळ-सायंकाळी फिरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. या वेळी सोशल डिस्टंन्सिंग पाळले जात नाही. काही नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे देखील दिसून आले आहे. शासकीय यंत्रणा नागरिकांच्या काळजीसाठी अहोरात्र झटत असताना नागरिक बिनबोभाटपणे कायद्याची पायमल्ली करत आहेत. अशा नागरिकांना समज देण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी टिमने रंगेश्वर पार्कमध्ये जाऊन मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची परेड घेतली.