नंदुरबार-नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे. नवापूरपासून अवघ्या काही अंतरावर तर, नंदुरबार शहरापासून 10 किलोमीटर वर गुजरात राज्याची सीमा आहे. महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने जिल्ह्यातील नागरिक गुजरातमध्ये जाऊन पेट्रोल भरताना दिसत आहेत.
अवघ्या काही अंतरावर पेट्रोलच्या दरात तफावत
महाराष्ट्र राज्यातील नवापूर तालुक्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर 97.86 रुपये इतके आहेत. तर पुढे अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर गुजरात राज्याची सीमा आहे. गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर 87 ते 88 रुपयांच्या आसपास आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक पेट्रोल भरण्यासाठी गुजरातमध्ये जात आहेत.
महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल स्वस्त 'पेट्रोल महाराष्ट्रसे दस रुपया सस्ता'
गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा पेट्रोलचे दर 10 रुपयांनी कमी आहेत, त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहक हे पेट्रोल भरण्यासाठी गुजरातच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या पेट्रोल पंपावर जात आहेत. दरम्यान या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गुजरातमधील एका पेट्रोलपंप चालकाने आपल्या पेट्रोल पंपासमोर एक बोर्डच लावला आहे. 'पेट्रोल महाराष्ट्रसे 10 रुपया सस्ता है, कृपया अपनी गाडी की टंकी यहापर ही फुल किजीऐ' असा बोर्ड या पेट्रोल पंपचालकाने लावला आहे. गुजरातच्या उच्छलमध्ये पेट्रोलचे दर हे 88.62 रुपये प्रति लिटर आहे, तर जिल्ह्यात पेट्रोलचे दर हे 97.96 असल्याने नागरिक पेट्रोल गुजरामध्ये जाऊन भरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पेट्रोल विक्री घटली आहे. याचा फटका पेट्रोल व्यावसायिकांना बसत आहे.