नंदुरबार - शहादा तालुक्यातील कुढावद परिसरात सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यात काढणीवर आलेल्या पपई व केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केळी व पपईची लागवड केली आहे. काल संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. जवळपास अर्धा तास झालेल्या पावसामुळे उभी असलेली केळी पिके कोलमडून गेली. तर पपई पिकाची पाने गळून झाडे जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे तालुक्यात केळी व पपई पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काढणीसाठी आलेल्या केळी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
शहादा तालुक्यातील जावदा, कुढावद, वेळावद, पिंपळोद, वाडी पुनर्वसन गावांमधील सुमारे 80च्या वर शेतकऱ्यांचे या पावसामुळे नुकसान झाले. यात कुढावद येथील संजय चौधरी, रवींद्र चौधरी, सुनील चौधरी, विनोद चौधरी, किशोर पाटील, अनिल पाटील, प्रशांत पाटील, विनोद पाटील यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
वादळी पावसामुळे कुढावद परिसरातील केळी व पपईचे पिके उध्वस्त गेल्या हंगामात लॉकडाऊनमुळे परराज्यातील व्यापारी पपई खरेदीसाठी न आल्यामुळे शेतकऱ्यांची तयार असलेली पपई मातीमोल भावाने विकावी लागली होती. तर, काही शेतकऱ्यांनी तयार असलेली पपई फेकून दिली होती. आता पपई उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.