नागपूर -मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या एका लोको पायलटला ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून 500 रुपयांना खरेदी केलेला थर्मास तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त महाग पडला आहे. विकत घेतलेला थर्मास पसंत पडला नाही. त्यामुळे विज्ञान प्यारेलाल मेश्राम यांनी तो थर्मास परत करण्यासाठी गुगलवरून कस्टमर केअर नंबरवरून संबंधीत शॉपिंग वेबसाईटशी संपर्क केला. त्यावेळी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या ते संपर्कात आले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी विज्ञान मेश्राम यांच्या खात्यातून तब्बल पाच लाखांपेक्षा जास्तची रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक केली. या संदर्भात विज्ञान मेश्राम यांनी कपिल नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
ऑनलाईन शॉपिंगचा फटका लोको पायलटला
आपल्या देशात सध्या ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड अगदी जोरात सुरू आहे. लहानातली लहान वस्तू सुद्धा ऑनलाईन शॉपिंग साईटवरून विकत घेतली जाते. लॉकडाऊनच्या काळात तर हा ट्रेंड फारच वाढलेला दिसतोय. सारेच काही ऑनलाईन उपलब्ध होऊ लागले आहे. दुसरीकडे फसवणुकीच्याही घटना वाढल्या आहेत. असाच फटका नागपूरच्या कपिल नगरच्या शेंडे नगर येथे राहणारे रेल्वे लोको पायलट विज्ञान प्यारेलाल मेश्राम यांनाही बसला आहे.
पैसे परत न मिळाल्याने...
विज्ञान मेश्राम यांनी एका ऑनलाईन साईटवरून एक थर्मास विकत घेतला. त्याचे पेमेंटसुद्धा ऑनलाईन पद्धतीने केले. निर्धारित वेळेत थर्मासची डिलिव्हरी सुद्धा झाली. मात्र, त्यांना तो थर्मास पसंत आला नाही. त्यामुळे विज्ञान मेश्राम यांनी थर्मास परत करण्यासाठी त्या कंपनीला रिक्वेस्ट पाठवली. कंपनीच्या माणसाने तो थर्मास परत घेऊन गेल्यानंतर काही दिवसांमध्ये पैसे परत मिळतील, असे सांगितले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने विज्ञान मेश्राम यांनी गुगलवरून त्या कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्या नंबरवरून विज्ञान यांनी आपली तक्रार सांगितली.