महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीक कर्ज मेळाव्यात 2216 शेतकऱ्यांचे अर्ज; 9 कोटी 74 लाखांचे कर्ज तत्काळ मंजूर - पीक कर्ज वाटप मेळावा

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पीक कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत जिल्ह्यातील 2216 शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज भरले. 1362 शेतकऱ्यांच्या कर्जाला यामध्ये मंजुरी देण्यात आली.

Crop loan distribute to farmers
नंदूरबारमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप

By

Published : Jun 24, 2020, 1:08 PM IST

नंदुरबार- शेतकऱ्यांना पीक कर्जाचे अर्ज भरण्यास सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यातील 103 बँक शाखांतर्फे विविध गावांमध्ये पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यांमध्ये एकूण 2216 शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज भरले. त्यापैकी 1362 शेतकऱ्यांच्या 9 कोटी 74 लाखांच्या कर्जाला अर्जाच्या छाननीनंतर तत्काळ मंजुरी देण्यात आली. उर्वरीत शेतकऱ्यांना अर्जाच्या छाननीनंतर कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी मेळाव्यांचे आयोजन

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी शेतकऱ्यांना कर्ज मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले होते. या मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना बँकेच्या प्रतिनिधींकडून अर्ज भरण्याविषयी माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून मेळाव्याच्या ठिकाणी अर्ज भरून घेत कागदपत्रांच्या पुर्ततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या 103 शाखांच्या माध्यमातून 1892 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 1276 अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामध्ये 9 कोटी 45 लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 324 अर्ज भरून घेण्यात आले आहेत. त्यातील 68 अर्ज मंजूर करण्यात आले असून 29 लाख 7 हजार रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना पुढील 8 ते 10 दिवसात अर्जाची छाननी करून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना अर्ज मिळण्यासाठी प्रशासनातर्फे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

पीक कर्जासाठी अर्ज भरून घेताना कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. शेतकऱ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच सॅनिटायझरचा वापरही करण्यात आला. पीक कर्ज मेळाव्यासाठी प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आणि बँकेच्या प्रतिनिधींनी चांगली कामगिरी केल्याबद्दल डॉ.भारुड यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, अशा शेतकऱ्यांनाही पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details