नंदुरबार- नवापूर शहरातील स्मशानभूमीत जळावू लाकडे ठेवल्याने अंतिम संस्कार करणारे नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीत मूलभूत सुविधा नसल्याने अंतिम संस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना गैरसोय होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.
नवापूर शहरातील एकमेव स्मशानभूमीची अवस्था मरणासन्न झाली आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या तीन महिन्यांपासून लाकडे अस्तव्यस्त अवस्थेत पडलेली आहे. बहुतांश ठिकाणी हौद आहेत. पण, त्यात भरण्यासाठी पाण्याचा पुरवठाच होत नाही. अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स नाहीत आणि लाईटही नादुरुस्त आहेत. स्मशानभूमीत येणारे लोक आधीच दु:खी असतात. अशा वेळी स्मशानभूमीतील गैरसोयींमुळे त्रास झाल्यास त्यांचा संताप होतो.