नंदुरबार -जिल्हा परिषदेचा सत्ता समीकरणाचा तिढा अखेर सुटला असून नंदुरबार जिल्हा परिषदेवर महाआघाडीने झेंडा रोवला आहे. राज्याच्या राजकारणातील या महत्त्वाच्या लढाईत भाजपच्या उमेदवारांसह सर्व सदस्यांनी काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. सीमा वळवी यांना मतदान केल्याने एक नवीनच सत्ता समीकरण समोर येऊ पाहत आहे.
हेही वाचा - नंदुबार पंचायत समिती निकाल : तीन जागी भाजप, दोन काँग्रेस, तर एकवर सेनेची सत्ता
काँग्रेस आणि भाजपला समसमान अशा 23 जागा मिळाल्यानंतर. शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही पक्ष्यांना सेनेच्या सदस्यांची साथ महत्वाची होती. अखेरच्या क्षणाला काँग्रेस आणि सेना एकत्र आल्याने भाजपचे सत्ता समीकरण अयशस्वी झाले. यावेळेस अध्यक्षपदासाठी मतदानाची वेळ जशी जवळ आली तेव्हा भाजपच्या सर्व सदस्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. सीमा वळवी यांना मतदान केल्याने त्यांना 56 मते मिळाली, तर उपाध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. भाजपचे जयश्री दीपक पाटील आणि शिवसेनेचे अॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी लढत होती. यात राम रघुवंशी यांना 30 मते मिळाली. तर भाजपच्या उमेदवारांना 26 मते मिळाली. निवडणुकी संदर्भात बोलताना आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी विरोधकांचे आभार मानले आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सीमा वळवी या सर्वात कमी वयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या आहेत. आपण नंदुरबार जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण कुपोषण आरोग्य रस्ते या समस्यांकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.