नंदुरबार- जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे व दर्जेदार घर उपलब्ध व्हावे म्हणून घरकुल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ३ जुलै रोजी आवास दिन साजरा करत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दीष्ट नंदुरबार जिल्हा परिषदने आखले आहे.
घरकुल योजनेची कामे पूर्ण करणारण्यासाठी आवास दिन साजरा - shahabaz shaikh
नंदुरबार जिल्ह्यात विविध आवास योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी जिल्हा परिषदेमार्फत बुधवारी आवास दिवस साजरा केला गेला.
देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर असावे यासाठी केंद्र व राज्य शासन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये आदिवासी विकास विभागातर्फे शबरी घरकुल योजना, समाज कल्याण विभागतर्फे रमाई आवास योजना आणि केंद्र शासनाचे प्रधानमंत्री आवास योजना यांचा समावेश आहे. योजनेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत ३८ हजार ५७४ घरकुले मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी २६ हजार ५०७ लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाचे काम पूर्ण केले आहे. २०१९-२० आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेकडून ४० हजार ६१२ घरकुलांचा प्रस्ताव देण्यात आले होते, त्यापैकी २५ हजार ९७९ घरकुलांना मंजुरी मिळाली असून शासन ४८७ कोटी रुपयांचा निधी देणार आहे.
घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे व प्रशासकीय अडचणींमुळे घरकुलांची कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. घरकुल योजनेची १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे.