नंदुरबार - कोरोनाचे संकट दिवसागणिक अधिक गडद होत चालले आहे. तर दुसरीकडे पोटाची भूक आता भय मानायला तयार नाही. त्यामुळे लॉकडाऊन काळात आपापल्या गावी परतलेल्या मजुरांनी रोजगारासाठी स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. यातील बहुतांश मजुरवर्ग हा गुजरात आणि मध्य प्रदेशकडे रवाना होताना पाहायला मिळत आहे.
नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुबलक प्रमाणात रोजगार येथे उपलब्ध नाही. यामुळे दरवर्षी जिल्ह्यातून गुजरात आणि मध्य प्रदेश येथे मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या कारणाने आपापल्या गावी, मजूर मिळेल त्या मार्गाने पोहोचले. हे संकट काही दिवसात संपेल, अशी त्यांची आशा होती.
पण, दिवसागणिक कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यात दुसरीकडे रोजगार नसल्याने पोटाची खळगी भरायची कशी? हा प्रश्न मजुरवर्गासमोर उभा राहिला. तेव्हा मजूरांना कोरोनापेक्षा पोटाचीच भीती वाटू लागली. यामुळे ते रोजगारासाठी जवळ असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेशकडे स्थलांतर करत आहेत.