नंदुरबार- राज्यातील रूग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये शिथीलता देण्यासाठी पाच टप्पे तयार करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात रूग्णसंख्या कमी झाल्याने नंदुरबार जिल्ह्याचा दुसर्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. दि. 7 जूनपासून सर्व व्यवसाय नियमित वेळेत सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. तर काही व्यवसायांवर अटी-शर्थींच्या आधारे मुभा दिली असून नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जारी केले आहे. अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने नियमितपणे सुरू राहणार आहेत. तर हॉटेल रेस्टॉरंट, मॉल, सिनेमागृह, लग्नसमारंभ, व्यायामशाळा, सलून याठिकाणी 50 टक्के क्षमतेच्या अटींवर पूर्वनियोजित वेळेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नंदुरबार जिल्ह्यात मे महिन्यापासून कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. राज्य शासनाने पाच टप्प्यांमध्ये जिल्ह्यांचा समावेश करुन कमी रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये काही निर्बंधांना शिथीलता देण्याचे आदेश दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात रूग्णांचा पॉझिटिव्ह रेट 3.31 टक्के असून ऑक्सीजन बेड 29.43 टक्के असल्याने नंदुरबार जिल्ह्याचा दुसर्या टप्प्यात समावेश आहे. त्यानुसार शासनाच्या निर्देशाप्रमाणे दुसर्या टप्प्यातील जिल्ह्यांसाठी असलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार दि.7 जुनपासून अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने पूर्ण वेळ सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच अनलॉक करताना नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिला आहे.