नंदुरबार - राज्यसह जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( Amrit Festival ) साजरा करत असलेल्या आपल्या देशात सातपुड्याच्या डोंगर- रांगात अजूनही पायाभूत सुविधांची किती भीषण परिस्थिती आहेत, याचा धक्कादायक वास्तव समोर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात रस्ताच्या अभावी आरोग्याच्या समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागत असते. मात्र, जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. याकडे प्रशासनाचे सक्षम दुर्लक्ष दिसून येत आहे. ( Nandurbar News ) बांबूलेन्स बंद व्हावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बाईक ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध केली. मात्र, ती देखील उपयोगी पडत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
दुर्गम भागात अद्यापही गरोदर मातांचे रस्त्यांआभावी हालच -केंद्र आणि राज्य सरकार रस्ते आणि आरोग्याच्या नावाने कोटय़वधींचा खर्च करीत असले, तरी आजही नंदुरबार जिल्ह्यतील अतिदुर्गम भागातील गरोदर महिलांना बांबुची झोळी करुन 3 ते 4 तासांचा यातनामय प्रवास करुन रुग्णालयापर्यंत आणावे लागत आहे. असे असताना हा कोट्यावधींचा खर्च जातो कुठे ? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. ( Nandurbar News ) त्यास कारण ठरले तळोदा तालुक्यातील कुवलीडाबर येथील गरोदर मातेचा बांबुलन्समधील जीवघेणा प्रवास. आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक योजना असतांनाही आजही त्यांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाड्यांवर फिरताना हाल -तळोदा तालुक्यात कुवलीडाबर हे गाव आहे. गावातील विमलबाई देवेंद्र वसावे या 8 महिन्यांच्या गरोदर महिलेला पोटात वेदना जाणवू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना गावातून बांबुच्या पारंपरिक झोळीत (बांबुलन्स) टाकून डोंगर पार करत 3 ते 4 तासांचा जीवघेणा प्रवास करत रापापूर या गावापर्यंत आणले. या प्रवासात विमलबाई यांच्या समवेत असलेले त्यांचे पती, भाऊ यांनी त्यांच्यावर बितलेली सर्व व्यथा सांगितली. असा त्रास महिन्या, 2 महिन्यातून एकदा भोगावाच लागत असल्याचे याच गावातील आशाताई वसावे यांनी सांगितले आहे. गावापर्यंत रस्त्याच नसल्याने गरोदर मातांना अशाच पध्दतीने झोळी करुन 3 ते 4 तासांचा खडतर डोंगर, दरीतील प्रवास करुन त्यांना रापापूर येथे आणले जाते. या ठिकाणी असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात नेले जाते. विशेष म्हणजे बाळंतीणचा रुग्णालयातून गावाकडे असा प्रवास यापेक्षा कठीण असल्याचे सांगितले. ( Nandurbar News ) गावात सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका आणि सहायक असाच जीवघेणा प्रवास करुन, महिलांच्या तपासणीसाठी येतात. गावापर्यंत रस्ता झाल्यास आरोग्य सुविधांसह आदिवासींचे जीवनमानही बदलेल, असा आशावाद आशाताईंना आहे. तळोद्यच्या उपजिल्हा रुग्णालयात कुवलीडाबरपासून 3 किलोमीटरवर वसलेल्या फलाईबारी गावच्या अमिला पाडवी यांनाही असाच त्रास झाल्याने झोळीत आणलेले आहे. त्यांच्या समवेत ६० वर्षांपेक्षा अधिक वयाची आई आणि गावच्या आशाताई मोगरा पाडवी या आहेत. सोमाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या कुवलीडाबर आणि फलाईबारी या गावासाठी दोन दशकांपासून रस्ता करण्याची मागणी होत आहे. परंतु, लोकप्रतिनिधींकडून याकडे लक्ष देण्यात येत नाही. नंदुरबारमध्ये आरोग्य सेवेच्या नावाखाली कोटय़ावधी रुपयांची उधळण करुन, रुग्णवाहिका आणि बाईक अॅम्ब्युलन्स खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र, आदिवासी बांधवाच्या अडी- अडचणीच्यावेळी जर या यंत्रणा कामाला येणार नसतील, तर कोटय़ावधींची उधळण ठेकेदारांच्या तुंबडय़ा भरण्यासाठीच का ? असाच काहीसा प्रश्न उपस्थित होत आहे.