नंदुरबार -नवीन वर्षात प्रत्येक जण वेगवेगळे संकल्प करत असतो. काहीजण अभिनव पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करतात. नंदुरबार शहरातील विद्यार्थ्यांनी नवीन वर्ष आरोग्यदायी जावे म्हणून सामूहिक सूर्य नमस्कार करत नवीन वर्षाचे स्वागत केले.
सामूहिक सूर्य नमस्कार घालून विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले विद्यार्थ्यांनी घातले सामूहिक सूर्यनमस्कार -
शहरातील श्रीमती एच जे श्रॉफ विद्यालयात 100 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्य नमस्कार घातले. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून नवीन वर्षाचे स्वागत केले. 2021 हे वर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी हा संकल्प शाळेच्यावतीने करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितीत असलेल्या मान्यवरांच्या हस्ते सूर्य पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना पटवून दिले सूर्य पूजनाचे महत्त्व -
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. दररोज किमान दहा सूर्यनमस्कार घालणे शरीरासाठी व आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सांगितले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सुरक्षितता व स्वयंशिस्त महत्वाची असल्याचा संदेश दिला. नवीन वर्ष आरोग्यदायी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
अधिकाऱ्यांची उपस्थिती -
एच जे श्रॉफ हायस्कूलतर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन अहिरे, दैनिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, क्रीडा अधिकारी सारिका पाटील यांच्यासह संस्थेचे चेअरमन व संचालक उपस्थित होते.