नंदुरबार- महाराष्ट्र शासनाद्वारे नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी नवापूर तालुक्यातील नागन प्रकल्पातून भरडू गावाजवळ असलेल्या सरपनी नदीद्वारे पाणी सोडण्यात आले. परंतु, जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कामांमुळे या पाण्याचा फायदा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांपेक्षा गुजरातला होताना दिसून येत आहे.
नंदुरबारमध्ये जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला.. - नंदुरबार
नागण प्रकल्पाचे सोडण्यात आलेले पाणी लहान बंधारे व सिमेंट नाला बंधारे नादुरुस्त असल्याने थेट गुजरातमध्ये वाहून जाते.
नवापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बद्दल उपाययोजना करण्यासाठी आमदार सुरुपसिंग नाईक यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत अनेकवेळा पत्र व्यवहार केला. प्रत्यक्षात भेट घेतली तरीसुद्धा उपाययोजना झाली नाही. नागण प्रकल्पाचे सोडण्यात आलेले पाणी लहान बंधारे व सिमेंट नाला बंधारे नादुरुस्त असल्याने थेट गुजरातमध्ये वाहून जाते. यासंदर्भात आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांकडे जाणूनबूजून भाजप सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप आमदार सुरुपसिंग नाईक यांनी केला आहे.
धरणातून पाणी सोडण्याआधी अधिकाऱ्यांनी सरपनी नदीवरील लहान बंधारे आणि सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती करून पाणी सोडायला पाहिजे होते. परंतु, अधिकाऱ्यांनी तसे केले नाही. त्यामुळेच महाराष्ट्राचे पाणी दुष्काळग्रस्त लोकांना न मिळता थेट गुजरात राज्यातील उकाई धरणात जाऊन जमा होत आहे.