नंदुरबार - शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांच्या वतीने नगरपालिकेच्या समोरील मुख्य रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांना चौकट आखून देत जागा देण्यात आली आहे. त्यामुळे भाजी बाजारातील गर्दी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. मात्र, सुरक्षित अंतर ठेवण्याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी ही अपेक्षा आहे.
भाजीपाला विक्रेत्यांनी सुरक्षित अंतर राखण्यासाठी नंदुरबार पालिकेतर्फे नियोजन - Nandurbar
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने विशेष दक्षता घेत उपाययोजना राबविल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने विशेष दक्षता घेत उपाययोजना राबविल्या आहेत. संचारबंदीतून किराणा व भाजीपाला विक्रीला मुभा असल्याने शहरातील स्टेट बँक परिसरात भाजीपाला विक्रीचा बाजार भरत होता. परंतु, त्याठिकाणी गर्दी होत असल्याने नगरपालिकेने सोशल डिस्टन्सिंगच्या नियोजनासाठी भाजीपाला विक्रेत्यांसाठी नवीन जागा निश्चित केली आहे. शहरातील नगरपालिका रस्त्याच्या मधोमध पांढर्या रेघा मारून भाजीपाला विक्रेत्यांसाठी सुरक्षित अंतराच्या चौकटी आखल्या आहेत.
या चौकटीत उभे राहून प्रशासनाच्या नियमांचे पालन करत प्रत्येक विक्रेत्याने तोंडाला मास्क लावूनच भाजीपाला विक्री करावा, असे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार भाजीपाला विक्रीच्या लॉरी लागल्याचे दिसून आले. तसेच नागरिकांनी आणि भाजीपाला विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे असे देखील नगरपालिका प्रशासनाच्यावतीने आदेशित करण्यात आले. प्रांताधिकारी वसुमना पंथ, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नगरपालिका मुख्याधिकारी बाबुराव बिक्कड, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्यासह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.