नंदुरबार - राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारातील शेतात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव झालेल्या कपाशी पिकाची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
नंदुरबार जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव; नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी - नंदुरबारमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव
नंदुरबारचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी चौपाळे शिवारातील बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
माजी मंत्री पद्माकर वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. खरबडे, तालुका कृर्षी अधिकारी आर. एम. पवार, मंडळ कृर्षी अधिकारी आर. सी. हिरे उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी साधला संवाद -
पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानाची लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले.
पंचनामे करण्याचे आदेश -
निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या सर्व शेतांचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे तसेच कीटकनाशकांची फवारणी करण्याच्या सूचनाही दिल्या.
यंदा परतीच्या पावसाचा राज्याला मोठा फटका बसला. सांगली, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, पुण्यासह इतर ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली. त्यातच आता उर्वरीत कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यात बोंडअळीच्या हल्ल्यामुळे कपाशी पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे, यंदा उत्पन्नात मोठी घट येणार आहे. पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला होता. मात्र, आता हातचे पीक गेल्याने सरकारने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.