नंदुरबार - सातपुडा पर्वत रागांमध्ये रस्त्यांअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. यावर मात करण्यासाठी आता नंदुरबार आरोग्य प्रशासनाने आपल्या ताफ्यात रुग्णांसाठी बाइक ॲम्ब्युलन्सचा समावेश केला आहे. आज (22 मे) जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी 10 बाइक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण केले आहे. 66 लाख किंमतीच्या या 10 बाइक ॲम्ब्युलन्स खडतर परिस्थिती असलेल्या दुर्गम भागात ठेवण्यात येणार आहेत. दोन वर्षे याच्या चालकासह सर्व खर्च संबंधित ठेकेदार करणार आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्ते नसल्याने झोळीमध्ये रुग्ण टाकून दवाखान्यापर्यंत पोहोचवला जात असे. आता या बाइक ॲम्ब्युलन्स कामी येणार आहेत. विशेष म्हणजे या ॲम्ब्युलन्समध्ये 10 लिटरच्या ऑक्सिजन सिलेंडरचीही सोय करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने गडचिरोली, पालघर आणि रायगड जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल भागात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून बाइक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देणार असल्याचे यावेळी पालकमंत्री के.सी. पाडवी यांनी सांगितले.
10 बाइक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण
जिल्ह्याचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्ह्यासाठी घेण्यात आलेल्या या 10 बाइक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. या बाइक ॲम्ब्युलन्ससाठी एकूण 66 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यात दोन वर्षासाठी चालक, देखभाल व दुरुस्ती, चालकाचे मानधन, प्रशिक्षण आदी खर्चाचा समावेश आहे. निती आयोगाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी या बाइक ॲम्ब्युलन्स उपयोगात आणल्या जाणार आहेत.