नंदुरबार - नवापूर तालुक्यातील वावडी गावात नंदुरबार वनविभागाच्या पथकाने अवैध वृक्षतोड केलेल्या कारवाईत २० लाखांचा मुदेमाल जप्त केला आहे.
नंदुरबार वनविभागाची अवैध वृक्षतोडीवर कारवाई
वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार वावडी गावात मोठ्या प्रमाणात आवैध जंगल तोड करून लाकडांचा साठा करण्यात आला होता. त्यानुसार वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवण्यात आली त्यात साग, खैर, शिसम या लाकडाचा मोठा साठा मिळाला. यात लाकडांची वाहतूक करण्यासाठी लागणारे वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
या भागाला लागूनच महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे वन क्षेत्र असल्याने आंतरराज्य लाकूड तस्करांची टोळी कार्यरत असल्याची संभावना आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात गुजरात राज्यातील वन विभागाची ही मदत घेतली जाणार असल्याची माहिती रणदिवे यांनी दिली.
वनविभागाने धाड घातल्याचे समजल्यानंतर लाकूड तस्कर पसार झाले. या तस्करांच्या विरोधात वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वन विभाग या गुन्ह्याचा तपास करत आहे.