नंदुरबार- अवकाळी पावसानंतर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची आवक वाढली आहे. बाजार समितीत दररोज तीन ते पाच हजार क्विंटल लाल मिरचीची आवक होत आहे. मात्र, मिरचीचा दर प्रति क्विंटल २८०० ते ४८०० दरम्यान स्थिरावला आहे.
नंदुरबार महाराष्ट्रातील प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा आहे. अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे मिरचीच्या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने मिरचीचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी महागड्या औषधी फवारणी करून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीत मिरचीची आवक वाढली असून दिवसाला 150 ते 200 वाहनांची आवक होत आहे. त्यामुळे बाजारात मिरचीचे दर तेजीत येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
हेही वाचा-ठाण्यात वाहतूक पोलिसांकडून एक महिन्यात सव्वा तीन कोटी दंड वसूल
अनेक अडचणींतून टिकविले मिरचीचे पीक
मिरचीवर आलेले विविध रोग आणि अवकाळी पाऊस या संकटात मिरची टिकविताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र दराचा प्रश्न उभा राहिला असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.