नंदुरबार : आदिवासी मागासलेला जिल्हा अशी नंदुरबारची ओळख. शिक्षण, आरोग्य, विकास यापासून वंचित राहिलेला जिल्हा असतानादेखील अत्यंत कमी यंत्रणा व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने उत्तम नियोजन करणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आदिवासी जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यास यश मिळविल्याचे दिसत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनातून कोरोना नियंत्रणााच 'नंदुरबार पॅटर्न' - rajendra bharud
महाराष्ट्रातील सर्वात अतिदुर्गम भाग असलेल्या सातपुडा पर्वत रांगेमध्ये वसलेला नंदुरबार आदिवासी जिल्हा. आधीपासूनच शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते या सुविधांपासून वंचित असलेला मागासलेला जिल्हा अशी ओळख असतानाही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या वैद्यकीय दूरदृष्टीमुळेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी मदत झाली आहे.
दुर्गम भागात पोहोचल्या सुविधा
महाराष्ट्रातील सर्वात अतिदुर्गम भाग असलेल्या सातपुडा पर्वत रांगेमध्ये वसलेला नंदुरबार आदिवासी जिल्हा. आधीपासूनच शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते या सुविधांपासून वंचित असलेला मागासलेला जिल्हा अशी ओळख असतानाही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या वैद्यकीय दूरदृष्टीमुळेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी मदत झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात बाधित रुग्णांवर वेळेवर उपचार व संचारबंदीचे काटेकोर पालनामुळे परिस्थिती नियंत्रणात होती. तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील काम सुरू असलेल्या महिला रुग्णालयाचे काम जलद गतीने पूर्ण करून दोनशे बेडचे कोविड रुग्णालय उभारून कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांसाठीही लॅबची व्यवस्था केली. तसेच ऑगस्ट 2020 रोजी हवेपासून ऑक्सीजन निर्मिती करणारे प्लांट उभारून रुग्णांचे जीव वाचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले.
दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यात जिल्हा प्रशासनाला यश
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारून कोरोना बाधित रुग्णांवर उपचाराला सुरुवात झाली होती. परंतु दुसर्या लाटेत बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने रुग्णांना उपचार मिळणे कठीण झालं होतं. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कंट्रोल रूम व वेबसाईटची निर्मिती करून रुग्णांना उपलब्ध बेड, रेमडिसिविर इंजेक्शन व चाचणी अहवाल ऑनलाईन देण्याची सुविधा करण्यात आली. रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्स च्या कमतरतेमुळे डॉ. भारूड व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची बचत करण्यासाठी वीस रुग्णांच्या मागे एक ऑक्सीजन सिस्टर पद्धत कार्यान्वित करण्यात आली. यामुळे ऑक्सिजनची मोठी बचत होत आहे. नंदुरबार ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बचतीसाठी ऑक्सिजन सिस्टरच्या कार्यप्रणालीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील कौतुक करुन संपूर्ण राज्यात ही पद्धत लागू करणार असल्याची ग्वाही दिली आहे.
रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी तत्पर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नंदुरबार जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. अशा वेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मदतीने नंदुरबार रेल्वे स्थानकात रुग्णांच्या उपचारासाठी रेल्वे स्थानकात आयसोलेशन कोचची निर्मिती करून रुग्णांना सेवा सुरू केली आहे. रेल्वे डब्यातील तापमान नियंत्रणासाठी भारतात प्रथमच डॉक्टर भारुड यांच्या कल्पनेतून रेल्वे डब्यावर गोणपाट अंथरून खिडकीजवळ कुलरची व्यवस्था करून तापमान कमी करण्याची व्यवस्था केली आहे.
अतिदुर्गम भागात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध
जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतील धडगाव, तोरणमाळ, मोलगी, अक्कलकुवा परिसरात रुग्णांना ऑक्सिजन बेडची सुविधा मिळत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ त्याची दखल घेऊन देणगीदारांच्या मदतीने दुर्गम भागात तब्बल २५० तात्पुरत्या स्वरूपाचे ऑक्सिजन कॅन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहे. तर शहरी भागात हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणारे तीन प्लांट कार्यान्वित करून दोन प्लांटचे काम युद्धपातळीवर सुरू असून जिल्ह्याला लागणाऱ्या ऑक्सीजन पैकी 50 टक्के निर्मिती होत आहे, उर्वरित ऑक्सिजनची धुळे, सुरत व मध्यप्रदेश येथून मदत घेतली जात आहे.
अतिदुर्गम भागात जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्षण
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचे पाचवी ते दहावी शिक्षण नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात झाल्याने त्यांना आदिवासी भागाची जाण असल्यामुळेच प्रभावी यंत्रणा उभी करण्यास मदत झाली. एकूणच नंदुरबार जिल्ह्यातील अपुऱ्या यंत्रणेतही दूरदृष्टी आणि योग्य अंमलबजावणीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी जिल्हा कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 40 हजारपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले असून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत प्रचंड गैरसमज असल्यामुळे प्रशासनासमोर लसीकरणाचे मोठे आव्हान आहे.