महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवीन शिधापत्रिका वितरीत करण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहिम; 36 हजार नागरिकांना अन्नधान्याचा लाभ - राजेंद्र भारुड न्यूज

नंदुरबार जिल्हा पुरवठा विभागाकडून नवीन शिधापत्रिका वाटप करण्यात येत आहे. अंतर्गत 4 हजार 100 नव्या शिधापत्रिका देण्यात आल्या. अंत्योदय आणि प्राधान्य योजनेचा लाभ 36 हजार 321 नागरिकांना झाला आहे.

Ration card distribution by district administration
जिल्हा प्रशासनाकडून शिधापत्रिका वाटप

By

Published : Jul 18, 2020, 10:49 AM IST

नंदुरबार - जिल्हा प्रशासनातर्फे नवीन शिधापत्रिका वाटपाची विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. गेल्या 4 महिन्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत 4100 नव्या शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या, तर 6 हजार 668 शिधापत्रिकांचा समावेश अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील 36 हजार 231 व्यक्तिंना अन्नधान्याचा लाभ झाला आहे.

शिधापत्रिका नसलेल्यांना त्या उपलब्ध करून देणे आणि शिधापत्रिका असलेल्यांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ देणे, अशा दोन्ही पातळ्यांवर ही मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार 4100 नव्या शिधापत्रिका वितरीत करण्यात आल्या, तर 6 हजार 668 शिधापत्रिकांचा समावेश वरील दोन्ही योजनेत करण्यात आला.

अंत्योदय योजनेअंतर्गत एकूण 3719 शिधापत्रिकांची वाढ झाली आहे. त्यापैकी अक्कलकुवा 1713, अक्राणी 1060, शहादा 1231 आणि नंदुरबार तालुक्यातील 261 आहेत. त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील 8778, अक्राणी 4897, नंदुरबार 346 आणि शहादा 5523 व्यक्तिंना योजनेचा लाभ होणार आहे. 546 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याने वाढ झालेल्या व्यक्तिंची एकूण संख्या 17 हजार 502 आहे.

प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत एकूण 7049 शिधापत्रिकांची वाढ झाली आहे. त्यापैकी अक्कलकुवा 2458, अक्राणी 82, शहादा 2893, नवापूर 1503 आणि तळोदा तालुक्यातील 1288 आहेत. त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील 6044, अक्राणी 420, शहादा 10033, नवापूर 6157 आणि तळोदा तालुक्यातील 4541 व्यक्तिंना योजनेचा लाभ होणार आहे. 8466 शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याने वाढ झालेल्या व्यक्तिंची एकूण संख्या 18हजार 729 आहे.

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना त्या उपलब्ध करून अन्नधान्याचा लाभ देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना या दोन्ही योजनेचा लाभ व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. जिल्हा पुरवठा कार्यालय आणि तालुकास्तरीय यंत्रणांनी मोहिम चांगल्या रितीने राबविल्याने भादल, भाबरी, उडद्या सारख्या दुर्गम गावातील नागरिकांनादेखील गावातच शिधापत्रिका प्राप्त झाल्या. शिधापत्रिका तयार करण्याचा खर्च न्यूक्लीअस बजेट अंतर्गत करण्यात येत आहे.संकटाच्या काळात नागरिकांना शिधापत्रिका प्राप्त झाल्याने अंत्योदय कुटुंबाला 35 किलो अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रती सदस्य 5 किलो वितरण करण्यात येणार आहे. दोन्ही योजनेअंतर्गत तांदूळ 3 रुपये प्रति किलो व गहू 2 रुपये प्रति किलो याप्रमाणे नियमित अन्नधान्याचे वितरण करण्यात येईल.

नियमित अन्नधान्य घेतल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रति सदस्य 5 किलो याप्रमाणे एकूण सदस्य संख्येनुसार मोफत तांदळाचे वाटपही करण्यात येणार आहे.

नव्याने शिधापत्रिका तयार झाल्याने आणि ‘वन नेशन वन रेशन’ योजनाही राज्यात सुरू झाल्याने स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना यापुढे नियमितपणे अन्नधान्याचा लाभ इतरही राज्यात घेता येईल. विशेषत: योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या दुर्गम भागातील नागरिकांना या मोहिमेमुळे प्रथमच या दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार आहे. ही मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागामार्फ दोन्ही योजनेद्वारे सुमारे 98 टक्के अन्नधान्य वितरण करून नागरिकांना दिलासास देण्यात आला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गतदेखील आतापर्यंत 6292.5 मे.टन तांदळाचे मोफत वितरण करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details