नंदुरबार Nana Patole On BJP :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांचा हा पहिला नंदुरबार दौरा असून, आज त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात दोन ठिकाणी मेळावे झाले. त्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची रणनीती आणि भाजपाच्या बेगडी हिंदुत्वावर भाष्य केलं आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत नाना पटोले म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोट्यवधी लोकांचा समूह उभा आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी फडणवीसांनी आरक्षणाचं आश्वासन जातींना कोणत्या आधारावर दिलं होतं? आता त्यांना का आरक्षण दिलं जात नाही? हा एक प्रश्न आहे. भाजपा जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
विधानसभा अध्यक्षांचा वेळकाढूपणा : आमदार अपात्र प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करतात. 90 दिवसांच्या आत यात निर्णय घ्यावा असा नियम असतानाही दुर्लक्ष केलं जाते. यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं त्यांच्यावर ताशेरे ओढल्याचे सर्वांनीच पाहिलं. त्यामुळे आमदार अपात्रतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, असे यावेळी नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीचे 40 ही आमदार निवडून येणार नाहीत, या मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी समाचार घेतला. भाजपाला सत्तेची गुर्मी आली आहे. त्यांनी आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असं आव्हान नाना पटोले यांनी केलं आहे.