महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहाद्यासह हळदाणीत कोरोनाचे दोन नवे रुग्ण, संपर्कातील 40 जण विलगीकरणात

सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या 9 जणांना घरी सोडण्यात आले, ही दिलासादायक बातमी असताना पुन्हा नव्याने दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

नंदुरबार कोरूना अपडेट
नंदुरबार कोरूना अपडेट

By

Published : Jun 3, 2020, 4:22 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतत असल्याची दिलासादायक बातमी असताना कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने त्या आनंदावर विरजण पडत आहे.

शहादा येथील प्रभाग क्र.3 मधील गरीब नवाज कॉलनीतील 42 वर्षीय पुरुषाला तर नवापूर तालुक्यातील हळदाणी गावाजवळील मोचाहोंडा भागात 48 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. प्रशासनाने खबरदारी घेत बाधितांच्या संपर्कात आलेल्या हळदाणीतील 31 आणि शहाद्यातील 6 जणांना क्वॉरंटाईन केले आहे. प्रशासनाने खबरदारी घेत काँटेन्मेन झोन जारी करून बाधितांचा वास्तव्य परिसर सील केला आहे. तसेच हळदाणी मोचाहोंडा, विसरवाडी गाव परिसर पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या 9 जणांना घरी सोडण्यात आले, ही दिलासादायक बातमी असताना पुन्हा नव्याने दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. पालिकेने सदर भागात निर्जंतुकीकरण फवारणी केली. या भागाला प्रतिबंधित झोन जाहीर करून अत्त्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. बाधित रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयात यापूर्वी उपचार करण्यात आले होते. प्रशासनाने सदरचे रुग्णालय सील केले असून तेथील कर्मचार्‍यांनाही क्वॉरंटाईन करून नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. बाधित रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.

हळदाणीत 31 जण क्वॉरंटाईन; विसरवाडी गाव पाच दिवस बंद


नवापूर तालुक्यातील विसरवाडीपासून किमान 4 कि.मी. अंतरावर असलेल्या हळदाणी गावात 48 वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी रात्री उशिराने प्राप्त झाला. सदर बाधित हा हळदाणी उपकेंद्रातंर्गत मोचाहोंडा भागातील रहिवासी आहे. हा बाधित रूग्ण मुंबईत पोलीस दलात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तो मुंबईहुन हळदाणी येथे आला होता. तसेच उपचारासाठी विसरवाडी येथील एका खासगी रुग्णालयात गेला होता. त्यानंतर हळदाणी, मोचाहोंडा, विसरवाडी गावात खरेदीसाठी देखील तो फिरला असल्याची माहिती आहे. रात्री उशिराने त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली.

अहवाल प्राप्त होताच नवापूरचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हरीश्‍चंद्र कोकणी, विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, सरपंच बकाराम गावीत, ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कुवर, डॉ.वसावे, राजेश येलवे, प्रदीप वाघ, अतुल पानपाटील, अनिल राठोड, वरिष्ठ लिपीक वसंत वळवी, दासु गावीत, ग्रामसुरक्षा दलाचे बबलु गावीत, विनोद पगारे, दिलीप गावीत यांनी हळदाणी गावात जावुन बाधिताचा वास्तव्य परिसर पूर्णपणे सील केला.

बाधिताच्या संपर्कात आलेल्या 31 जणांना आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे. तसेच खबरदारीसाठी विसरवाडी, मोचाहोंडा व हळदाणी परिसरात सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. प्रशासनाने विसरवाडीसह हळदाणी व मोचाहोंडा हे गाव पाच दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विनाकारण कोणीही गावात फिरू नये, तोंडाला मास्क लावावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details