नंदुरबार Girish Mahajan On Sanjay Raut : नंदुरबार येथील सारंगखेडा यात्रा उत्सवातील चेतक फेस्टिवलला (Chetak Festival) मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार जयकुमार रावल (Jayakumar Rawal) उपस्थित होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण नाही, यावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांचा पक्षही नाही आणि ते कुठल्याही पक्षाचे अध्यक्षच नाहीत. म्हणून त्यांना आमंत्रण दिलं नाही. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईला येण्याची गरजच पडणार नाही. मराठा समाजाला टिकेल असंच आरक्षण दिलं जाईल आणि मराठा समाजाला योग्य तो न्याय दिला जाईल, असं देखील यावेळी महाजन म्हणाले.
मंत्री गिरीश महाजन यांनी केली घोडेस्वारी : मंत्री गिरीश महाजन यांनी सारंगखेडा येथील घोडे बाजारात घोडेस्वारी केली. सारंगखेडामध्ये भरणारा जगविख्यात घोडे बाजार हा खानदेश आणि महाराष्ट्रासाठी भुषण असून, या घोडे बाजाराच्या नावलौकिकासाठी पर्यटन विभागातून सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलं. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांना घोडेस्वारी करण्याचा मोह आवरता आला नाही. ते आणि त्यांच्यासमवेत आलेले आमदार जयकुमार रावल यां दोघांनी घोडेस्वारीचा आनंद लुटला.
संजय राऊतांना डायरिया झालाय का? : संजय राऊत रोजच्या रोज नवीन शोध कुठून लावतात हा प्रश्न महाराष्ट्राला पडतो. महाराष्ट्राची जनता राऊतांना कंटाळली आहे. ते सकाळपासून डायरिया झाल्यासारखं बोलत राहतात, असा टोला गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. भाजपा हेच ब्रिटीशांना गोपनीय माहिती पुरवत असल्याचा आरोप करणाऱ्या राऊतांना गिरीश महाजन यांनी ब्रिटीशांच्या काळात भाजपा होती का? असा सवाल केला आहे. संजय राऊतांच्या डोक्याची किती किव करावी असं सांगत या माणसाचं काय करावं हा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. डायरिया झाल्यासारखं राऊत सकाळपासून ओकतच राहतात. राऊतांमुळं लोकांची करमणूक होते, मात्र, त्या करमणुकीला लोकही कंटाळले आहेत. असं पात्र महाराष्ट्रात झालेलं कोणीही पाहिलेलं नाही, अशी टीका मंत्री गिरीश महाजण यांनी राऊतांवर केलीय.