नंदुरबार- देशातील सर्वात मोठ्या घोडे बाजाराला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तीन वर्षे सरकारने सारंगखेडा येथील चेतक फेस्टीव्हलला मदत केली. मात्र, यावेळी मदत नाकारली गेली. पण, चेतक फेस्टीव्हलमधील सर्व अश्व स्पर्धा लोकसहभागातून होणार असून त्यासाठी परिसरातील अश्व प्रेमींनी लाखो रुपयांचा निधी उभारला आहे. तर देशभरातून आलेल्या व्यापारी आणि अश्व शैकिनांनी सरकारने या फेस्टीव्हलकडे सकारात्मक पहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सारंगखेडा घोडे बाजार नियोजन आणि सुरक्षितता यासाठी देशभरातील अश्व व्यापाराच्या पसंतीला उतरला आहे. त्यासोबतच या बाजारात चेतक फेस्टीव्हल अंतर्गत होणाऱ्या घोड्यांच्या विविध स्पर्धा आणि त्यातील लाखोंची बक्षिसे असतात. यामुळे यावर्षी राज्यसरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत असून याला अजून मदत करावी, अशी अपेक्षा घोडे व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यावर्षी बाजारात जातिवंत घोडे विक्रीसाठी आले असून बाजारात मोठी आवक आहे. त्यासोबतच पांढरा नुखरा घोडे कमी झाले असून मारवाड जातीचे जातिवंत घोड्याची आवक वाढली आहे. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारने मदत नाकारली असली तरी परिसरातील अश्व शैकिनांनी लोकसहभागातून चेतक फेस्टीव्हलमधील सर्व स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारी बक्षिसे आणि इतर असा 35 लाखांचा निधी उभारण्यात येत आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.