नंदुरबार- कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली. मात्र, काही नागरिक या संचारबंदीचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यांच्यामुळे इतरांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र, काही नागरिक असेही आहेत जे आपली सामाजिक जबाबदारी समजून कायद्याचे पालन करत आहेत. जिल्ह्यातील मंदाने या गावातील ग्रामस्थांकडून संचारबंदीचे पूर्णपणे पालन केले जात आहे. युवकांकडून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात.
गावातील युवकांनी एकत्र येत गावाच्या सिमेवर नाकाबंदी केली आहे. प्रत्येक युवकाकडून गावाच्या सिमेवर २ तास पहारा दिला जात आहे. त्यांच्यासोबत गावातील आरोग्य केंद्रातील कर्मचारीही असतात, ते गावात येणाऱ्यांची तपासणी करतात व गावात दररोज फवारणी करतात. तसेच, वाहनावर स्पीकर लावून जनजागृती केली जाते, गावातील कोणीही कामाशिवाय बाहेर येत नसून गावकऱ्यांनी स्वताला स्वयंशिस्त लावली आहे. ग्रामीण भागातील महिला आपली दैनदिन कामे मास्क लावून करत आहेत.