नंदुरबार - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आठ दिवसांची कडक संचारबंदी लागू केल्याने जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर ही चार शहरे लॉकडाऊन झाली आहेत. लॉकडाऊन केल्याने चारही शहरांमध्ये शासकीय कर्मचारी व पोलीस वगळता कोणीही फिरकले नाही. यामुळे रुग्णालये व औषध विक्रीची दुकाने वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवले आहेत, तर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई देखील केली आहे.
जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे ही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असल्याने संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 23 ते 30 जुलै असे आठ दिवस कडक संचारबंदी चारही शहरांमध्ये लागू केली आहे. मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू झाल्याने शहरांच्या प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स लावून प्रवेश बंद करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त तैनात आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर या चारही शहरांमध्ये संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली. या संचारबंदीतून शासकीय व बँक कर्मचार्यांना वगळण्यात आल्याने शहरांच्या प्रवेशद्वारांच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या पोलीसांनी प्रत्येकाची विचारपूस केली. विनाकारण शहरात जाणार्यांना तंबी देवून घरी पाठविले, तर शासकीय कर्मचार्यांच्या ओळखपत्रांची पडताळणी करुन शहरात प्रवेश देण्यात आला.