नवापूर ( नंदुरबार ) : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील वडखुट येथील वांत्या आवश्या गावीत यांच्या शेतात असलेल्या १६ के.व्ही. वीज पोलवर गेल्या दोन दिवसापासून काही तांत्रिक बिघाड झाले होते. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करताना विजेचा शॉकपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास वीज वितरण कंपनीचे लाईनमन अनिल फत्तेसिंग गावीत रा.नागझिरी ता.नवापूर हे वीज कनेक्शन दुरूस्त करण्यासाठी आले होते. मात्र यात त्यांचा मृत्यू झाला.
खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम :खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाला. यात लाईनमन अनिल गावीत यांना विजेचा जोरात शॉक लागला. त्यानंतर वीज पोलवर चिटकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि. 5 दुपारच्या सुमारास घडली. त्यानंतर ही घटना वार्यासारखी गावात पसरताच बघ्यांची गर्दी झाली होती.
विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल :याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उप.निरिक्षक भुषण बैसाणे, पो.कॉ.अनिल राठोड, अतुल पानपाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात पोलिसांकडून करण्यात आले आहे. लाईनमन अनिल गावीत हे नवापूर येथील वीज वितरण कंपनी कार्यालयात नौकरी करत होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा असा दुदैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.