नंदूरबार - 'निसर्ग' चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकले आहे. याचा फटका नंदूरबार जिल्ह्यालाही बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातदेखील येत्या 24 तासात पाऊस व जोराचे वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी आणि घरातच रहावे, असे आवाहन पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी केले आहे.
निसर्ग वादळ : नागरिकांना सतर्क राहण्याचे पालकमंत्री पाडवी यांचे आवाहन - नंदूरबार निसर्ग वादळ
'निसर्ग' चक्रीवादळामुळे नंदूरबार जिल्ह्यात देखील पाऊस आणि जोराचा वारा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी आणि घरातच रहावे, असे आवाहन पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी केले.
काही वेळापूर्वीच 'निसर्ग' चक्रीवादळ हे अलीबागच्या किनारपट्टीवर धडकले आहे. या वादळाचा प्रवास नंदूरबार जिल्ह्यातून मध्यप्रदेशाकडे होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेषत: जुने घर, पत्र्याचे घर, कच्चे घर किंवा घर पडण्याचा धोका असलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता म्हणून आपल्या जवळच्या सामाजिक सभागृहात, शाळेत किंवा समाज मंदीरात तात्पुरता आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनी आपली जनावरे झाडाखाली बांधू नयेत. ती सुरक्षित ठिकाणी बांधावी. नदी, नाले यापासून दूर रहावे.
जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक यासाठी सज्ज आहे. जर एखादी दुर्घटना घडली तर त्वरीत ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी किंवा तहसिलदारांशी संपर्क साधाव, जेणेकरुन त्वरीत मदत पोहचवणे शक्य होईल. नागरिकांनी काळजी करु नये. तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात. आपण या संकटावर नक्कीच यशस्वीपणे मात करु, असा विश्वास पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी व्यक्त केला आहे.