नंदुरबार -जिल्ह्यात कोविड-19 विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा नगर पालिका क्षेत्र तसेच अक्राणी नगर पंचायत व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात येत्या 15 एप्रिलपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नागिरकांनी जनता कर्फ्युला स्वत:हून प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अत्यावश्यक सुविधा वगळता व्यवस्थापन
जिल्ह्यात आठवड्याच्या शनिवारी व रविवारी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना, गॅस वितरण सुविधा पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. वरील ठिकाणातील अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या वाहनासाठी पेट्रोलपंप सुरू राहतील. अन्य वापरासाठी प्रतिबंध असेल. सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना व शासकीय कार्यालये या दिवशी बंद असल्याने शनिवार व रविवारी कोणीही बाहेर पडू नये. वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडताना रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे. आठवड्यातील इतर दिवशी सर्व आस्थापना, दुकाने सकाळी 6 ते सायं. 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असेल.