नंदुरबार - गुजरात परिवहन मंडळाने महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आंतरराज्यीय बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या बसची संख्या ४३ आणि महाराष्ट्र येणाऱ्या बसची संख्या ४३ आहे. म्हणजे २४ तासात एकूण ८६ बस दोन राज्यांदरम्यान ये-जा करतात. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गुजरात परिवहन महामंडळाने महाराष्ट्रात येणाऱ्या ४३ बस रद्द केल्या आहेत. गुजरातमधून येणाऱया बस सोनगडपर्यंतच येणार असल्याचे पत्रकही काढण्यात आले आहे. याची अंमलबजावणी शुक्रवारपासून होणार आहे.
दोन राज्यांना जोडणारी लालपरी बंद या निर्णयामुळे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मात्र, महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या बस नियमीत प्रमाणे जातील, अशी माहिती नवापूर आगाराचे प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे.
हेही वाचा -भारतात कोरोनाचे १९५ रुग्ण; महाराष्ट्र आणि केरळात सर्वात जास्त फैलाव
प्रवाशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने एसटीच्या गाडय़ांमधील बैठक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. त्यानुसार एसटीमध्ये एका आसनावर एकच प्रवासी बसवण्यात येणार आहे. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत राज्य परिवहन महामंडळाने सर्व आगारांना सूचना पाठवल्या आहेत. 'सुरक्षित अंतर ठेवा' ही योजना राबवून प्रवाशांमधील संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गरज भासल्यास जादा बसची व्यवस्था करण्यात येईल. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन एसटीकडून करण्यात आले आहे.