नंदुरबार - भारतीय ट्रायबल पक्षाकडून कृष्णा गावित यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. हा पक्ष पहिल्यादांच निवडणूक लढवत आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत, असे गावित यांनी म्हटले आहे.
नंदुरबारमध्ये भारतीय ट्रायबल पक्षाकडून कृष्णा गावितांना उमेदवारी - भारतीय ट्रायबल पक्ष
भारतीय ट्रायबल पक्षाकडून कृष्णा गावित यांना नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
भारतीय ट्रायबल पक्षाची स्थापना गुजरात मधील आदिवासी समाजाचे नेता छोटू भैया वसावा यांनी केली आहे. महाराष्ट्रात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रथमच ते निवडणूक लढवत आहेत. यासाठी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गावित यांना उमेदवारी दिली आहे.
गेल्या एकाहत्तर वर्षात आदिवासी समाजाचा विकास झालेला नाही. सातपुड्यात आजही माणूस आजारी पडला तर त्याला झोळी करून ४०-४५ किलोमीटरपर्यंत उपचारासाठी पायी घेऊन जावे लागते. कुपोषण, बेरोजगारी, उच्चशिक्षण, आदिवासी वस्तीगृहातील डीबीटीचा प्रश्न, वन जमीन हस्तांतरण आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी, अशा अनेक प्रश्नांना संसदेत मांडण्यासाठी निवडणूक लढवत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट संविधानातील पाचव्या अनुसूचीची अंमलबजावणी करावी ही आहे. संविधानातील पाचव्या अनुसूचीत प्रत संसदेत धूळ खात पडली आहे. ती शोधण्यासाठी मी थेट दिल्लीला संसद भवनात जात असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.