नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यातील गर्भवती मातांची प्रसुती सामान्यपणे करण्याऐवजी सीझर शस्त्रक्रियेद्वारे केली जात आहे. त्यामुळे सीझर करून बाळांना जन्म देण्याच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवभरात 15 पैकी 5 मातांचे सीझेरियन प्रक्रियेने प्रसुती होत आहे. याविरुद्ध खासगी रुग्णालयात सामान्य पद्धतीने बाळांचा जन्म होण्यास प्राधान्य दिले जात आहे. यातून जिल्ह्यातील 16 नर्सिंग होममध्ये दिवसभरात सरासरी एक, तर अपवाद वगळता एकापेक्षा अधिक सीझर प्रक्रिया होत आहे.
हेही वाचा -गायी शिकार केल्याने बिबट्याला विष देऊन मारले, चौघांची वनकोठडीत रवानगी
जिल्ह्यात सीझेरियन होण्याची प्रमुख कारणे
जिल्ह्यात सीझेरियन होण्याचे प्रमुख कारण म्हणजे बाळाचे वजन अधिक असणे, डोके मोठे असणे, मातेच्या शरिरातील गुंतागुंतीचे बदल, गर्भाशयातील अडचणी, या सर्व बाबींचा विचार करून सीझर करण्याबाबत निर्णय घेतला जात आहे. जिल्हा रुग्णालयात सीझर होणाऱ्या बहुतांश माता या ग्रामीण भागातील असल्याचे धक्कादायक सत्य यात समोर आले आहे. कमी वयात होणारे विवाह, शारीरिक कमकुवतपणा, ऐन गर्भधारणेत न मिळालेले पोषण यातून मातांना सीझरला सामोरे जावे लागत आहे. मातेच्या पालकांसह सासरच्यांकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर सीझर शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांकडून देण्यात आली.